अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा झाला होता, यंदा मात्र निर्बंध शिथिल झाले असल्याने पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, कोरोनाचे भय आणि एकाच वेळी अनेक यजमानांकडे जाणे शक्य नसल्याने यावर डोंबिवलीतील पुरोहितांनी ऑनलाइन पूजेचा तोडगा काढला आहे. फेसबुक लाईव्ह, झूम, गुगल मीट यांसारख्या हायटेक पद्धतीचा अवलंब करत ते त्याद्वारे गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शुक्रवारी पार्थिव गणेश स्थापनेच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. ज्या यजमानांनी या पूजेसाठी आधीच नोंदणी केली आहे, अशा भक्तांनी पुरोहितांकडून लिंक पाठवली जाणार आहे. त्यामुळे पुरोहितांना एकाच वेळीच अनेक यजमानांना पूजा सांगता येणार आहे. मागील वर्षीही काही पुरोहितांनी ऑनलाइनद्वारे पूजा सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्याला काही प्रमाणात यश मिळाल्याने यंदा मोठ्या प्रमाणात नोंदणी करून पूजा सांगितल्या जाणार आहेत.
पूजेसाठी लागणारी सगळी तयारी यजमानांना सांगण्यात आली आहे. ऐन वेळी कोणतीही खोटी होऊ नये, यासाठी यादीनुसार पूजेसाठी सर्व साहित्य आणले का, याची खात्री गुरुजी दोन दिवस आधीपासूनच करत होते. दुसरीकडे अनेक पुरोहित शहरातल्या शहरात यजमानांकडे जाऊनही पूजा सांगणार आहेत. पण कोविडची भीती, शंका असल्याने अनेकांनी थेट ऑनलाइन पूजेला पसंती दिली आहे. तसेच गुरुजींना दक्षिणाही विविध ऑनलाईन माध्यमे, पेमेंट ॲपद्वारे पाठवली जाणार आहे.
श्रावणात अगदी अमेरिका, सिंगापूर, जर्मनी आदी ठिकाणी शहरातील पुरोहितांनी ऑनलाइनद्वारे सत्यनारायण पूजा सांगितल्या होत्या. एकूणच पुरोहितांच्या या ऑनलाइन सेवेमुळे यजमानांनीही समाधान व्यक्त केले आहे.
--------------
आता यंदा आम्ही फेसबुक, यूट्यूबवर लाईव्हद्वारे श्री गणेश प्रतिष्ठापनेची पूजा सांगणार आहोत. दोन्हीकडे एकाच वेळी लाईव्ह पूजा सांगितली जाईल. त्यासाठी सकाळी १०.१५ वाजता सगळ्या यजमानांनी तयार राहावे, असे सांगण्यात आले आहे. संबंधितांना पूजेची लिंक पाठवली आहे. : प्रदीप जोशी, गुरुजी, डोंबिवली
-----------------
कोविड काळात ऑनलाइन पूजेचे महत्त्व सगळ्यांना कळले. पूजन होत असल्याने यजमान समाधानी, आनंदी असतात. यंदा श्रावणात डोंबिवलीहून सिंगापूर, अमेरिका आदी देशात गेलेल्या यजमानांनी ऑनलाइन सत्यनारायण पूजा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार पूजा सांगण्यात आल्या. गणेशोत्सवातही काहींनी ऑनलाइन पूजनाची मागणी केली आहे. त्यालाही प्रतिसाद मिळतो आहे. निर्बंध शिथिल झाल्याने प्रत्यक्ष जाऊन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून पूजन केले जाणार आहे
- चिंतामणी शिधोरे, गुरुजी
-------------