मुरबाड - पंतप्रधान आवास प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत ग्रामपंचायत स्तरावर नावे समाविष्ट करण्याची मुदत संपली होती. मात्र, वंचित लाभार्थ्यांच्या अनुषंगाने ही मुदत वाढवण्यात आली आहे. आॅगस्ट २०१८ पूर्वी होणाऱ्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामपंचायतीतील इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या यादीत नावे नोंदवण्याचे आवाहन मुरबाड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी दोडके यांनी केली आहे. पंचायत समिती सभापती जनार्दन पादीर आणि उपसभापती सीमा घरत यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच ग्रामसेवकांना नावे नोंदवून घेण्याचे आवाहन केले आहे.तालुक्यात अनेक कुटुंबे घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुबांना घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी २०११ ते २०१२ दरम्यान झालेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणाचा निकष घेऊन लाभ दिला जात होता. मात्र, शासनाला मिळालेल्या यादीनुसार अनेक पात्र कुटुंबांची नावे समाविष्ट नसल्याने या योजनेचा लाभ घेऊ शकले नव्हते.त्या अनुषंगाने शासनाने मुदतवाढ दिली असून आॅगस्ट २०१८ पूर्वी कुटुंबांनी ‘ड’ यादीत नावे नोंदवावीत, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना घरकुले मिळणार आहेत.कुटुंबांचे होणार सर्वेक्षणया नाव नोंदवलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाऊन त्यांना लाभ मिळेल, याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी वंचित कुटुंबांनी ग्रामसभेत नावे लवकरात लवकर नोंदवण्याबाबत पत्रकाद्वारे सूचित केले आहे.
पंतप्रधान आवास योजना : घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 3:11 AM