- नारायण जाधव ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यात असलेल्या एका वाहनाने २००४ मध्ये केलेल्या अपघातप्रकरणी दावेदारास मूळ नुकसानभरपाई १२ लाख ९७ हजार १६० रुपये अन् त्यावरील व्याज मात्र १४ लाख सात हजार ४१८ रुपये ६० पैसे अशी एकूण २७ लाख चार हजार ५७९ रुपये जमा करण्याची नामुश्की अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांवर ओढवली आहे. ही रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोटार वाहन अपघात दावा प्राधिकरणाकडून ठाणे जिल्हा न्यायाधीशांकडे अनामत रक्कम म्हणून जमा करण्यास सांगितल्याने त्यानुसार गृह विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या नावे असलेले वाहन क्रमांक एचएच ०९ यू ८५१८ यास १७ एप्रिल २००४ रोजी ठाण्याच्या खोपटनाका येथे अपघात झाला होता. ते वाहन ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी टी.जी. बांदल हे चालवित होते. यात अशोक पाल नावाचे गृहस्थ जखमी झाले होते.याप्रकरणी त्यांनी नुकसानभरपाईसाठी ठाणे जिल्हा न्यायाधीक क्रमांक ४ यांच्या कोर्टात मोटारवाहन अपघात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल अशोक पाल यांच्या बाजूने लागला होता. तेव्हा न्यायालयाने पाल यांना १२ लाख ९७ हजार १६० रुपये व त्यावर २ जुलै २००७ पासून सात टक्के इतक्या दराने व्याज देण्यास सांगितले होते. मात्र, या निकालाविरोधात कारागृह महानिरीक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात सिव्हील अॅप्लिकेशन २०१८ मध्ये पहिले अपील दाखल केले होते.मुंबई उच्च न्यायालयाने या अपिलावरील सुनावणीत राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांना मूळ रक्कम १२ लाख ९७ हजार १६० रुपये व त्यावरील २ जुलै २००७ पासून सात टक्के इतक्या दराने व्याज १४ लाख सात हजार ४१८ रुपये ६० पैसे असे एकूण २७ लाख चार हजार ५७९ रुपये ठाणे जिल्हा न्यायाधीक क्रमांक ४ यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, गृह विभागाने ही रक्कम जमा करण्यास २० फेबु्रवारी २०२० रोजी मान्यता दिली आहे.
भरपाईची मूळ रक्कम १३ लाख अन् त्यावरील व्याज मात्र १४ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:59 AM