ठाणे :
पावसाळयामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच नालेसफाई व रस्त्याच्या दुरूस्तीची कामे तसेच धोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश विभागांना महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी दिले. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे सर्व शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पोलीस प्रशासन, आरटीओ, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, शासकीय रुग्णालय, महानगर गॅस विभागाचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये श्री. शर्मा यांनी शहरातील प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करुन सी १ व सी २ इमारती खाली करण्याचे तसेच ज्या भागात दरड कोसळयाचा संभव आहे अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना देखील स्थलांतरीत करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
पावसाळयात महावितरण, पालिकेचा विद्युत विभाग यांनी संयुक्तपणे काम करतानाच ज्याठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबर्सची झाकणे बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या तसेच कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रीत करुन ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
ठाणे शहरातील आपत्कालीन २४ तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी. यावेळी महापालिका आयुक्तांनी, वाहतूक पोलीस विभाग, महानगर गॅस, महावितरण, रेल्वे, आणि सर्वच जिल्हा स्तरीय यंत्रणांनी आपसामध्ये समन्वय साधून आपत्तीचा सामना करण्याचे आवाहन केले.