बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवल्यावर धरणात प्रथमच पूर्णक्षमतेने पाणी भरण्यात आले आहे. या धरणासाठी ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले, त्यांच्या कुटुंबाने प्रकल्पासाठी दिलेले योगदान मोलाचे होते. त्यामुळे आता धरणाचे काम झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.बारवी धरण भरून वाहू लागल्याने या धरणाची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई हे धरणावर आले होते. एमआयडीसीच्या मालकीच्या या धरणामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागणार आहे. अशा या धरणाची विधिवत पूजा करण्यासाठी देसाई आले होते. त्यांनी धरणाच्या कामाची आणि धरणाच्या दरवाजांची पाहणी केली. तसेच धरण क्षेत्रात बाधित झालेल्या गावांची माहिती घेतली. धरणातील पाणीसाठा आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी याची माहिती त्यांनी घेतली. तसेच बाधित कुटुंबीयांना करण्यात आलेली मदत आणि त्यांच्या पुनर्वसन पॅकेजची माहिती घेतली. तसेच अद्यापही ज्यांचे पुनर्वसन केलेले नाही, त्यांच्या समस्येची माहिती घेतली.घरमालकांना भरपाई दिलीदेसाई यांना धरणाविषयी माहिती देताना अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी धरण पूर्णक्षमतेने भरल्यावर काय स्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती दिली. जी घरे पाण्याखाली आली आहे आणि त्या घरमालकांना भरपाई दिलेली आहे, त्या घरांमधील बांधकाम साहित्यसंबंधित व्यक्तीलाच देण्याबाबत मत व्यक्त करण्यात आले.फलक लावलेपाण्याच्या प्रवाहात जाण्यासाठी असलेले रस्ते हे बंद केले आहेत. तसेच स्थानिकांना मासेमारी आणि पोहण्यासाठी न उतरण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच पर्यटकही काही ठिकाणी पाण्यात उतरत असल्याने त्या ठिकाणीही धोका असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीला प्राधान्य; सुभाष देसाई यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:03 PM