डोंबिवली: २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २७ गाव संघर्ष समिती, अन्य युवा नेते सगळे आग्रही आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर त्यानंतर भेडसावणा-या समस्यांबाबत काय विचार केला आहे? जो कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट कशी, कुठे लावायची. त्यासह सर्वच समस्या तातडीने उभ्या राहणार आहेत. ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भविष्याचा वेध घेऊन निर्णय घ्यावा असे परखड मत शिवसेनेचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.निश्चित धोरण नसल्याने अनेकांनी या ठिकाणी रहावे की न रहावे असा पवित्रा घेतला आहे. ज्या नागरिकांमुळे नेते निवडून येतात, त्यांच्या मनस्थितीचा विचार करण्याला प्राधान्य द्यावे असेही म्हात्रे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे देखिल सातत्याने सकारात्मक पवित्रा घेत उम्मीद पे आशा कायम ठेवत आहेत, ते योग्यच आहे. पण कल्याण-डोंबिवली महापालिकेला आता एवढ्या वर्षांनी ते पण पूर्णपणे अच्छेदीन आलेले नाहीत. सुमारे ३० वर्षांनी आता कुठे पाण्याचा प्रश्न काहीसा मार्गी लागला आहे. कच-याची समस्या सर्वश्रुत आहे.२७ गावांचा कचरा ही गावे वगळली होती तरीही केडीएमसी हद्दीतच आधीही आणि आताही जात आहेच. पण यापुढे जर स्वतंत्र नगरपालिका झाली तर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात होणा-या कच-याचे काय करणार? या ठिकाणी पाणी समस्या भेडसावत आहे, ती मार्गी लावण्यासाठी केडीएमसीने काही का होईना अमृत योजना तर लागू केली, त्यासाठी कोट्यवधींची तरतूदही केली. पाणी समस्या सोडवण्यासाठी काम सुरु झाले आहे. म्हणजे आता केडीएमसीने या २७ गावांना सामावून घेतल्यानंतर या ठिकाणी हळुहळू विकासकामे सुरू झाली आहेत हे वास्तव आहे. तुप खाल्यावर रूप येते असे होत नाहीच ना? निदान थोडा कालावधी जाणारच ना? त्यामुळे कोणतेही निर्णय घेतांना सर्वसामान्य मतदारांना विचारात घेणे अपेक्षित आहे. सगळया निर्णयांमध्ये त्या नागरिकांचा विचार व्हायला हवाच. कचरा टाकण्यासाठी भविष्यात केडीएमसीने नकारात्मक पवित्रा घेतला तर पर्याय काय? आरोग्य सुविधेचा बोजवारा असातांना एवढी वर्षे केडीएमसीवरच येथील नागरिक अवलंबून आहेत ना? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय होण्याआधी त्यातून निष्पन्न होणारे परिणाम,त्याची दाहकता याचाही अभ्यास करणे आवश्यक असून अंतिम निर्णयाप्रत जावे असे म्हात्रे म्हणाले.