ठाणे : एकीकडे कोपरीतील आनंदनगर भागातील ६२ नागरिकांना कासारवडवली भागात क्वॉरंटाईन केले असतांनाच, आता वर्तकनगर येथील एका खाजगी रुग्णालयालाही महापालिकेने क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रुग्णालयाचा २६ जणांचा स्टाफ आणि त्याठिकाणी विविध उपचार घेण्यासाठी दाखल झालेले ९ रुग्ण अशा तब्बल ३५ जणांना मंगळवारी रुग्णालयातच क्वॉरन्टाईन केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या रुग्णालयात २३ मार्चपर्यंत एक रुग्ण हा उपचारासाठी दाखल होता. आता तो रुग्ण इतर रुग्णालयात उपचार घेत आहे. परंतु, आता त्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
आनंदनगरातील ६२ नागरिकांना कासारवडली येथे देखरेखाली ठेवले आहे. सध्या त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. परंतु, त्यांना १४ दिवस येथे ठेवले जाणार आहे. दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. त्यानुसार खबरदारी म्हणून महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच आता संपूर्ण खाजगी रुग्णालयच महापालिकेने क्वॉरन्टाइन केल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे यातून दिसत आहे. सोमवारी वर्तकनगर येथील एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण परदेशवारी करून आला होता. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता.
१८ मार्च ते २३ मार्च पर्यंत तो या रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर तो मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाला. सोमवारी त्याचा रिपोर्ट आला असून त्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेने दिली.या रुग्णालयामध्ये २६ जणांचा स्टाफ असून येथे ९ रुग्ण विविध उपचारांस दाखल झाले आहेत. या सर्वांनाच रुग्णालयातच क्वारन्टाइन केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. त्यांची तपासणी करून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.