लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर भागातील दिया या खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली, परंतु ऑक्सिजनचा साठा संपण्याआधीच रुग्णालय प्रशासनाने आयसीयूमधील सात रुग्ण हलविण्याचा विचार सुरू होता. रात्री उशिराही या रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे अडचणीत आलेल्या या रुग्णालयाला अखेर महापालिकेने चार जम्बो ऑक्सिजन सिलिंडर दिल्याने तूर्तास येथील रुग्णांना हलविण्यात आले नाही. बुधवारी सकाळपर्यंत हा साठा पुरेल, असा दावा पालिकेने केला आहे. तोपर्यंत रुग्णालयाला साठा उपलब्ध झाला नाही, तर मात्र रुग्णांना हलविले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले. वर्तकनगर भागातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने, चार जणांना जीव गमवावा लागल्याची घटना अलीकडेच घडली.
घोडबंदर भागात वाघबीळ येथे ४२ बेडचे रुग्णालय असून, या रुग्णालयात ३५ रुग्ण सध्या उपचारार्थ दाखल आहेत. या ठिकाणी २८ ऑक्सिजनचे बेड असून, त्यातील सात रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल असून, या रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आल्याने चार तास आधीच त्यांनी या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधून रुग्ण हलविण्याची मागणी केली, तसेच संबंधित रुग्णालयातील काही कर्मचारीही ऑक्सिजन सप्लायरकडे गेल्याचे सांगण्यात आले. २५ सिलिंडर मिळतील, अशी शक्यता त्यांना वाटत होती, परंतु रात्री ८ वाजेपर्यंत त्यांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. आयसीयूमधील एका रुग्णाला सांयकाळी ६च्या सुमारास दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उर्वरित सहा रुग्णांना रात्री ८ वाजेपर्यंत हलविण्यात आले नव्हते, परंतु ऑक्सिजनची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न झाल्याने अखेर महापालिकेने चार जम्बो सिलिंडर रुग्णालयाला देऊ केले असून, बुधवारी सकाळपर्यंत हा ऑक्सिजन रुग्णांना पुरेल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. तोपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, तर मात्र रुग्णांना हलविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
......
वाचली