लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील संपलेला ऑक्सिजनचा साठा अद्याप उपलब्ध झालेला नाही. परंतु, आता महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच शहरातील खासगी कोविड, नॉन कोविड रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. मागणी करूनही जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपासच पुरवठा होत असल्याने रुग्णालयातील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्याची धावपळ त्यांना करावी लागत आहे. विशेष म्हणजे सध्या शहरातील कोविड, नॉन कोविड सुमारे ७५ रुग्णालयांतील ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे.
ठाणे शहरात कोरोनाचे ९८ हजार ६६४ रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत ८० हजार ६२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर एक हजार ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६ हजार ३८८ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. ते करण्यासाठी महापालिकेची कोविड सेंटरदेखील आता अपुरी पडू लागली आहेत. अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपल्याने येथील २६ रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविले होते. त्यामुळे ग्लोबलवरील ताण वाढला आहे. चार दिवस उलटूनही पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला अद्यापही ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही, तर ग्लोबलला रोज पुरेल एवढाच साठा मिळत असल्याने महापालिकेला देखील रोजच्या रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयासाठी रोजच्या रोज २० केएल ऑक्सिजनची गरज लागत आहे.
आता खासगी कोविड रुग्णालयांवरदेखील कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात आजघडीला एकूण २५० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खासगी कोविड, ५० नॉन कोविड रुग्णालयातदेखील कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी सध्या धावपळ करावी लागत आहे. यातील एका खासगी रुग्णालयातील साठा संपल्याची बाब मंगळवारी समोर आली. परंतु, या रुग्णालय व्यवस्थापनाने आधीच दखल घेऊन येथील १७ रुग्णांना इतर रुग्णालयात हलविल्याने मोठी हानी टळली. परंतु शहरातील इतर रुग्णालयांचीदेखील तीच अवस्था असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ऑक्सिजनवरील प्रत्येक रुग्णाला रोजच्या रोज ३ ते ५ लीटर ऑक्सिजन लागत आहे. परंतु पुरवठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी होत असल्याने खासगी रुग्णालयांची परिस्थिती आता गंभीर होताना दिसत आहे.
रुग्णांना वाचविणे हा आमचा धर्म आहे. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल आणि त्यात रुग्णाचा जीव गेला, तर पुन्हा आमच्यावरच त्याचे खापर फोडले जाईल, याची भीतीदेखील या खासगी रुग्णालयांना भेडसावत आहे. त्यामुळे एक वेळेस मेडिसिनसाठी आम्ही दोन दिवस थांबू. मात्र, ऑक्सिजनशिवाय राहता येत नसल्याने त्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, अशी मागणी या रुग्णालयांनी केली आहे. सध्याच्या घडीला या प्रत्येक रुग्णालयात एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे.
....
एक वेळेस रेमडेसिविर किंवा इतर मेडिसिनसाठी एक ते दोन दिवस राहता येऊ शकते. ऑक्सिजन हा रुग्णांसाठी आवश्यकच आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु सध्या सर्वच यंत्रणांवर ताण वाढला आहे, आमची यंत्रणादेखील दिवसरात्र काम करीत आहे. त्यातूनही प्रशासनाने आम्हाला ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.
(डॉ. संतोष कदम, इंडियन मेडिकल असोसिएशन, अध्यक्ष, ठाणे )