- प्रशांत माने, कल्याणसोयी-सुविधांअभावी कल्याण डोंबिवली महापालिकांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र असले तरी या शाळांभोवती वाढणारे खाजगी शाळांचे प्रस्थही पालिका शाळांमधील घटत्या पटसंख्येला कारणीभूत ठरत आहे. शाळेच्या १ कि.मी परिसरात अन्य शाळेला परवानगी नाही असा नियम आहे. परंतु वस्तुस्थती पाहता याकडे शासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.डागडुजीअभावी पालिकेच्या बहुतांश शाळा दुरावस्थेच्या गर्तेत सापडल्या असताना काही शाळांची स्थिती चांगली असल्याचेही दिसते. येथील वालधुनी परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक विद्यालय पाहता याची साक्ष पटते. सुसज्ज दुमजली इमारतीत इयत्ता १ ली ते ७ वी चे मराठी माध्यमाचे वर्ग येथे भरतात. येथे नऊ शिक्षक कार्यरत असून उत्तम शिक्षण दिले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. २०११-१२ मध्ये ही शाळेची नवीन वास्तू उभारण्यात आली. याआधी चाळ टाईप वास्तूत शाळा भरायची. येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नियमितपणे दिला जातो. पाठ्यपुस्तके मिळाली आहेत. त्याचबरोबर वह्या आणि दप्तरांचे वाटप देखील सुरू झाले आहे. शिक्षणाला पोषक वातावरण येथे पहावयास मिळत असले तरी पटसंख्या समाधानकारक नाही. सध्या विद्यार्थी पटसंख्या १८९ असून बालवाडीत ७२ मुले शिकतात. या शाळेच्या आसपाास मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळा आहेत. शाळा-शाळांमध्ये १ कि.मी चे अंतर बंधनकारक असताना हा नियम येथे पायदळी तुडविला जात असून शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी खाजगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे देखील या पालिका शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. शाळेत पाच संगणक होते परंतु नादुरूस्त अवस्थेत आहेत. तर सफाई कर्मचारी देखील शाळेला दिला गेलेला नाही. याकडे शिक्षण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.
खाजगी शाळा पालिका शाळांच्या मुळावर!
By admin | Published: July 27, 2015 11:26 PM