ठाणे : भिवंडीच्या धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील वाढती वीजगळती, थकबाकी आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यांत या भागाचेही खाजगीकरण केले जाणार असल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी ठाणे येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच राज्यातील मालेगावातही विजेचे खाजगीकरण केले जाणार आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ८७ हजार सदोष मीटर बदलण्यात आले असून मीटरचा असलेला तुटवडासुद्धा आता दूर झाला असल्याचा दावा त्यांनी केला.
महावितरणने मागील चार वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भिवंडीत विजेचे खाजगीकरण केल्याने वीजगळती ५० टक्कयांवरून १८ टक्कयांवर आली आहे. त्याच धर्तीवर आता कळवा, मुंब्य्रातील नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने खाजगीकरणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून येत्या तीन महिन्यांत कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांचे खाजगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे येथील दीड लाख ग्राहकांना याची झळ मात्र बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु, यामुळे वीजचोरीला आळा बसणार असून गळतीचे प्रमाणही कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात १६ लाख मीटर हे सदोष होते. तर, ठाणे जिल्ह्यात याचा आकडा हा तीन लाख ८७ हजार एवढा होता. परंतु, आता ते मीटर बदलण्यात आले असून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रोलेक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.
शिवाय, त्यांना काळ्या यादीत टाकल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी मीटरतुटवडा जाणवत होता. परंतु, आता २० लाख नवीन मीटर मागवले आहेत. ठाणे जिल्ह्यात ४१ हजार मीटरची गरज असून त्यातील २८ हजार ५०० मीटर आले आहेत. उर्वरित मीटरही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी कायम ठेवला असून कळवा, मुंब्य्रातील भारनियमनाबाबत त्यांना छेडले असता, ज्या पद्धतीने आठवड्यातून एकदा रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो, त्याच पद्धतीने या भागात देखभाल, दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे याला भारनियमन म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोलर विजेचा प्रयोग यशस्वीराज्यातील गडचिरोली आणि नंदुरबार भागांतील काही गावपाड्यांमध्ये आज वीज पोहोचलेली नाही. परंतु, या भागातही डिसेंबरअखेर वीज दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. शेतकºयांसाठी सोलर विजेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून आता तो संपूर्ण राज्यात राबवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रयोगामुळे शेतकºयांना वीज स्वस्त मिळणार असून त्यामुळे महावितरणचा आणि एकूणच इतर ग्राहकांवरील बोजाही कमी होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात २९६ कोटींची थकबाकीराज्यात शेतकºयांकडे २५ हजार कोटींची थकबाकी असून आता दुष्काळ पडल्याने वसुली थांबवली आहे. तर, राज्यातील इतर ग्राहकांकडे पाच हजार कोटींची थकबाकी आहे. तसेच ठाणे जिल्ह्याची थकबाकी ही २९६ कोटींची असून त्यामध्ये मुंब्य्राची ७३ कोटी, तर कळव्याची २० कोटी थकबाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.आॅनलाइनलासात महिन्यांत८५० तक्रारीमहावितरणने आता ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आॅनलाइन प्रणालीचा आधार घेतला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ८५० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.