ठाणे : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात ठाणे रेल्वेस्थानकाला यंदाचा स्वच्छतेचा ‘बेस्ट रेल्वे स्टेशनचा पुरस्कार’ एप्रिल महिन्यात मिळाला . त्यावेळी ठाणे हे एकमेव रेल्वे स्टेशन ए-१ या श्रेणीत होते. पुरस्कार म्हणून मिळाली मानाची शिल्ड (ढाल) ही मात्र,सद्यस्थिती ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात एका कपाटावर धूळखात आडवी पडलेली आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने तिला उभी करण्याचा प्रयत्न करताच ती पडण्याची भिती असल्याने तिला आडवी ठेवल्याचे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या वतीने सीएसएमटी येथे ६४ वा सप्ताह आयोजित केला होता. या कार्याक्रमांतर्गत मुंबई विभागात येणाऱ्या रेल्वे स्थानकांना १६ एप्रिल रोजी विविध श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्यामध्ये ठाणे स्टेशनला बेस्ट स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. तो मध्य रेल्वेचे डीआरएम संजयकुमार जैन यांच्या हस्ते तर एडीआरएम विद्याधर माळेगावकर, पीयुष ककड, आशुतोष गुप्ता आदी मान्यवंराच्या उपस्थित देण्यात आला.
शिल्ड आणि रोख दोन हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार भारतीय रेल्वेच्या १६६ व्या वर्धापनदिनी मिळाला. तसेच उत्कृष्ट स्वच्छतेसाठी ठाण्याला २००४ नंतर तब्बल १५ वर्षांनी हा पुरस्कार ठाण्याला मिळाला आहे. ही शिल्ड दरवर्षी पुरस्काराच्या स्वरूपात फिरती राहते. त्याच्यावर संबंधित गौरवण्यात येणाºया रेल्वेस्थानकांच्या नावाची नोंदणी केली जाते. तसेच वर्षभर ती गौरवण्यात येणाºया त्या रेल्वेस्थानकातील अधिकारी कार्यालयात ठेवली जाते.
मध्यंतरी ठाणे रेल्वे स्थानकाचे नाव अस्वच्छ रेल्वे स्थानकाच्या टॉप टेन यादीत आले होते. तो डाग पुसण्याबरोबरच ठाणे रेल्वेस्थानकाला स्वच्छतेमध्ये बेस्ट रेल्वे स्थानक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्याच पुरस्काराची शिल्ड गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रबंधक कार्यालयातील एका लोखंडी कपाटावर धूळखात पडली आहे.
पुरस्काराची शिल्ड स्थिर उभी राहत नाही. त्यामुळे त्यासाठी खास अशी काचेपेटी तयार केली. पण ती पेटीही काही कारणास्तव छोटी बनवली गेली. त्यातून ती शिल्ड पडू नये म्हणून तिला सुरक्षितरित्या एका ठिकाणी आडवी ठेवली आहे.- आर. के. मीना, प्रबंधक, ठाणे रेल्वे स्थानक