कल्याण : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटात मालमत्तांचे नुकसान झालेल्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. ती न मिळाल्यास आगामी निवडणुकांवर जवळपास १० हजार बाधित बहिष्कार टाकतील, असा इशारा डोंबिवली वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.प्रोबेस स्फोटाच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली. स्फोटात नुकसान झालेल्या दोन हजार मालमत्ताधाराकांचे पंचनामे महसूल खात्याने केले होते. सात कोटी ४२ लाख रुपये भरपाईचा प्रस्ताव महसूल खात्याने राज्य सरकारकडे पाठविला गेला. परंतु, मुख्यमंत्री सहाय्यता निधीने हात वर केल्याने भरपाईची ही रक्कम दिली गेली नाही. ‘प्रोबेस’ने विमा काढलेल्या कंपन्यांकडेच त्यासाठी दावे दाखल करावेत, असा सल्ला सरकारी यंत्रणेने दिला होता. त्यामुळे बाधितांच्या तोंडाला पाने पुसली गेली.राज्य सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने स्फोटाची कारणे नमूद केली. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अतिधोकादायक कारखाने स्थलांतरित करण्यासह अन्य काही सूचना अहवालात नमूद केल्या. मात्र, मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत, तसेच ती कोणी द्यावी, याविषयी अहवालात कोणताच उल्लेख केला नाही. घटनेच्या वर्षभरानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला गेला. तो स्वीकारून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र, सरकारने साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे अहवालास काहीच अर्थ नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
प्रोबेस स्फोट : भरपाई न मिळाल्यास निवडणुकांवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:25 AM