कल्याण : एकीकडे केडीएमसी प्रशासन स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवत जात असताना दुसरीकडे येथील पश्चिमेकडील भागात असलेल्या मुस्लिमबहुल प्रभागांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नागरी समस्यांवर तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात असलेल्या डागडुजीमुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यात नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
पश्चिमेतील गफूर डोन चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाडा आणि बैलबाजार या चार प्रभागांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. पायवाटा, गटारे सुस्थितीत नाहीत, ड्रेनेजची समस्या, कचराकुंड्या आणि कचºयाची समस्याही जटिल बनली आहे. या समस्यांवर वर्षानुवर्षे केवळ तात्पुरती मलमपट्टी व डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे. नवीन ठोस कामे होत नसल्याने त्याच समस्या पुन्हा उद्भवत आहेत. ड्रेनेजची सुविधा योग्य नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात चार महिने मलमूत्र असलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिक आपले बाजार आणि इतर कामे पार पाडत आहेत.
धार्मिक प्रार्थनास्थळेही अशा घाणीच्या पाण्याने वेढलेली असतात. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रोगराईचा प्रश्नही निर्माण झाला असून त्यात रस्तेही सुस्थितीत नाहीत. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील गतिरोधकांवर पांढरे पट्टे न मारल्याने त्यावर भरधाव वेगातील दुचाकी आदळून अपघात होत आहेत....तर रस्त्यावर उतरूप्रभागांकडे केडीएमसीचे झालेले दुर्लक्ष पाहता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन दिले आहे. प्रभागातील समस्यांबाबत एकाही अभियंत्याला या भागात वेळ द्यावासा वाटत नाही, याचे कारण काय? असा सवाल शेख यांनी केला आहे. १५ दिवसांत या प्रभागांमध्ये ठोस कृती महापालिकेकडून झाली नाही तर मनसेला रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे न्याय मिळवावा लागेल, असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे.