कल्याण : उंबर्डे, बारावे आणि मांडा या तीन ठिकाणी एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व शास्त्रोक्त भरावभूमी उभारण्याकामी कार्यादेश देण्यात आले आहेत. यातील उंबर्डेचे काम अंतिम टप्प्यात असून बारावे प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. मांडा येथील प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचे कामही सुरू केले जाणार असल्याने लवकरच आधारवाडी डम्पिंगची समस्या निकाली निघेल, असा दावा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी केला.पत्रकार दिनाचे औचित्य साधत आयुक्तांनी मुख्यालयातील त्यांच्या दालनात वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात त्यांनी केडीएमसी क्षेत्रातील जुन्या आणि नवीन प्रकल्पांच्या प्रलंबित कामांसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी क चऱ्याच्या समस्येवर बोलताना घनकचरा व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांची वस्तुस्थिती मांडली. आयुक्त बोडके यांनी कचरा समस्येसोबतच रिंगरोड, स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेच्या सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली.घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत उंबर्डे आणि आयरे येथील बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाला आहे. बारावे, कचोरे, राजूनगर येथील कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि शास्त्रोक्त भरावभूमी उभारण्यासाठी एप्रिल २०१७ ला कार्यादेश दिले आहेत. उंबर्डे आणि बारावे प्रकल्पाला पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळाला आहे. उंबर्डे येथील प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून जानेवारी २०२० अखेर तो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. काही रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांना प्रकल्पाबाबत शंका आहेत त्यांच्या शंकाचे निरसन करून हा प्रकल्प चालू केला जाईल. बारावे प्रकल्पास स्थानिकांनी हरकत घेतली असल्याने त्याची सुनावणी हरित लवाद यांच्या आदेशानुसार सुरू आहे. त्या प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. मांडा येथील प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आॅक्टोबरमध्ये हे काम पूर्ण होईल, याकडे आयुक्त बोडके यांनी लक्ष वेधले.स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आजच्या घडीला प्रत्यक्षरीत्या दिसत नसले तरी सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा, ड्रोन सर्व्हे ही कामे सुरू आहेत. अमृत योजनेंतर्गत दोन टप्प्यांत मलनिस्सारण प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे. ही कामे डिसेंबर २०२० पर्यंतपूर्ण होणे अपेक्षित असल्याचे बोडके म्हणाले.>रेल्वेसोबत करणार करारनामाकोपर उड्डाणपूल दुरुस्तीसंदर्भात निविदा जारी करण्यात आली आहे. रेल्वेसोबत करारनामा झाल्यानंतर त्याही कामाला लवकरच सुरुवात होईल. वडवली उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असले तरी हे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत कल्याण पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, रेल्वेची त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे आयुक्त म्हणाले.कामे अंतिम टप्प्यात : रिंगरोड प्रकल्पाचे काम सात टप्प्यांत होणार आहेत. यातील चार टप्प्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होईल, असा दावा आयुक्तांनी केला. पुनर्वसन धोरणाअंतर्गत सर्वच बाधित पात्र ठरणार नाहीत. रिंगरोडमध्ये बाधित होणाºया चाळींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी जागामालकाने घेतली तर त्याला टीडीआर स्वरूपात मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आधारवाडी डम्पिंगची समस्या लवकरच निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:04 AM