भिवंडी : भिवंडी-ठाणे महामार्गावर एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे, भिवंडी, कल्याण असे मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र या कामात नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनासह या मार्गावर टोलवसुली करणारी कंपनी व एमएमआरडीए प्राधिकरणात एकसूत्रीपणा नसल्याने या मार्गावर रोज वाहतूककोंडी होते.
जिल्हा परिषदेच्या सदस्या सपना राजेंद्र भोईर यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, दहा दिवसांत वाहतूककोंडीवर तोडगा काढला नाही, तर कशेळी टोलनाका येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनिता परदेशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता पाटीलदेखील उपस्थित होत्या.
ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठा गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये-जा असते. भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात. त्यातच आता शाळा सुरू असल्याने या कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. अनलॉकनंतर या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतले आहे.
मात्र हे काम करण्याआधी अतिक्रमणे हटविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावर कोंडी होत आहे. कशेळी, काल्हेर, पूर्णा, राहणाल येथे जाणाऱ्या कामगारांना, तसेच भिवंडी, ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागते. याशिवाय रस्त्यावर स्थानिक नागरिक, तसेच व्यावसायिक आपली वाहने उभी करून ठेवत असल्यानेही वाहतूककोंडीत भर पडते.