कल्याण : शाहीनबागच्या धर्तीवर १३ दिवसांपासून कल्याण येथील गोविंदवाडी येथे पोलिसांची परवानगी न घेता नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी रात्री उशिरा हजेरी लावत उपस्थितांना संबोधित केले. या सभेचे आयोजन करणारे तौहिद ऊर्फ गोल्टी सय्यद आणि लाउडस्पीकर मालकाविरोधात पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
गोविंदवाडीतील केडीएमसी मैदानामध्ये ‘हम भारत के लोग फोरम’तर्फे ‘शाहीनबाग अॅट कल्याण’ असा फलक लावून २२ जानेवारीपासून साखळी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे आयोजक तौहिद यांना बाजारपेठ पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. शनिवारी रात्री आव्हाड यांनी येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधितदेखील केले. ही सभा रात्री ११.५५ वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे तौहिद आणि लाउडस्पीकरच्या मालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
वीजपुरवठा खंडित
दरम्यान, आंदोलनस्थळी असलेला वीज पुरवठा सोमवारी वीज वितरण कंपनीने खंडित केला. त्यामुळे आयोजकांनी मोबाइलच्या उजेडात आंदोलकांना प्रोत्साहन दिले. वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी आपणास साधी कल्पनाही दिली नसल्याचा आरोप यावेळी आयोजकांनी केला.