लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : उल्हासनदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी जात असल्याने ती प्रदूषित होत आहे. बदलापूरमध्ये उल्हासनदी अधिक प्रदूषित होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ अंतर्गत प्रसिद्ध झाले. याची नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दखल घेत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षमपणे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच जे लहानमोठे नाले थेट उल्हासनदीला मिळतात त्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. बदलापूरमधून वाहत जाणाऱ्या उल्हासनदीच्या सुरक्षेची जबाबदारी ही बदलापूरकरांची आहे. त्यामुळे आता होणारे उल्हासनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले असून ते सर्व सांडपाणी मलनिस:रण प्रकल्पात आल्यावर त्यावर योग्य प्रक्रिया केली जाते. मात्र शहरात असे काही नाले आहेत की जे थेट उल्हासनदीला जाऊन मिळतात. या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने काय करता येईल याचा आढावा घेतला जात आहे. नाल्यावरील पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. भुयारी गटाराचे पाणी थेट उल्हासनदीत जात असल्याने त्याचे प्रदूषण हे आधी प्रचंड प्रमाणात होते. आता हे पाणी मलनिस्स:रण प्रकल्पात जात असल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले आहे. जे मोठे नाले थेट नदीत जातात त्या पाण्याचे नियोजन करण्याचा विचार पालिका करत आहे. प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
सांडपाण्यावर होणार प्रक्रिया
By admin | Published: May 23, 2017 1:34 AM