डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फूट रोडवरील खड्डेमय रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी अद्याप केडीएमसीला मुहूर्तच सापडलेला नसताना जेथे काही कामानिमित्त खोदकाम चालू आहे, तेथील काम झाल्यावर खड्डे योग्य रीतीने भरले जात नसल्याचे चित्र येथील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. यात एखाद्या वाहनाला अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ठाकुर्लीतील ९० फूट रोडची स्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. खंबाळपाडा येथून म्हसोबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना त्याची डागडुजी पावसाने उघडीप देऊनही केलेली नाही. त्यामुळे येथे खड्ड्यांच्या त्रासासह धुळीचा प्रचंड त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, कल्याणकडे जाणारा कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ताही आता वाहनांसाठी धोकादायक झाला आहे. येथे कचोरेकडे जाणाºया रस्त्यावर चढणीचा रस्ता जेथे संपतो, त्याच्या अगदी तोंडावर काही कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. काम झाल्यावर खोदलेला रस्ता मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला. दरम्यान, टाकलेला मातीचा ढीग वरच राहिला असून त्यावर वाहन आदळू नये म्हणून एका झाडाची छोटी फांदी त्यात रोवण्यात आली आहे. रेल्वे समांतर रस्ता काही अंशी सुस्थितीत आहे. त्यामुळे येथून भरधाव वेगात काही चालक वाहने चालवत असतात. चढणीच्या रस्त्यावर वाहनाचा वेग जास्त असल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. अन्यत्र ठिकाणी पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचा त्रास कायम असताना कामांसाठी खोदकाम केलेले रस्तेही योग्यरीत्या बुजवले जात नाहीत, हे वास्तव येथे पाहायला मिळत आहे.खड्डे कधी बुजणार?ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते पंचायत बावडी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण, या मार्गावरील हनुमान मंदिराजवळ पडलेले खड्डे डांबराने भरण्यात आलेले नाहीत. आधीच हा रस्ता चिंचोळा असून त्यात खड्डेही भरले जात नसल्याने येथे सकाळ, संध्याकाळ सातत्याने वाहतूककोंडीचे चित्र दिसून येते.
कामांचा दर्जा निकृष्टपंचायत बावडीपासून ते महिला समिती विद्यालयापर्यंत पडलेले खड्डे महापालिकेकडून बुजवण्यात आले खरे, पण कामांच्या काही ठिकाणी डांबर निघायला सुरुवात झाल्याने कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.