ठाणे : ज्ञानसाधना महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे माजी प्रमुख प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतनचे ते संस्थापक होते. ठाण्यातील अनेक नामवंत कलाकार, राजकीय नेते त्यांचे शिष्य होते.
ज्ञानसाधना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या वर्तकनगर एज्युकेशन सोसायटीच्या जुनियर कॉलेजचही ते प्राचार्य होते. कुठल्याही विषयावर लेखन करणे हा त्यांचा हातखंडा होता. मृदू स्वभाव असल्यामुळे जनमानसात ते लोकप्रिय होते. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांची मदत असे. तीनच दिवसांपूर्वी त्यांची नात ईशाखा खोल्लम हिच्या भरतनाट्यम् अरंगेत्रम कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. खोल्लम सरांच्या निधनाने मित्रमंडळी, अनेक संस्थांचा आधारवड हरपला.