प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : युपीए सरकारच्या काळात नवव्या स्थानी असलेला भारत आज जगात पाचव्या स्थानी असून या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे. १९७१ च्या जनगणनेत ३ टक्के साक्षर होते आज ७४ टक्के साक्षर आहोत असे मत राजकीय विश्लेषक प्रा.संगीत रागी यांनी व्यक्त केले.
ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे उद्धाटन प्रा.संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झाले. त्यावेळी "आझादी का अमृत महोत्सव" हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहीत व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा.रागी यांनी, प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नकाशाचा उल्लेख करून विविध दाखले दिले. ही भूमी देवदुतांच्या अवतारांची नसून साक्षात देवांची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार, ब्रम्हदेशपर्यत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये, संस्थाने या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असुन गुरु - शिष्याच्या परंपरेने भारत विशाल बनला आहे. वेद, उपनिषदे व शास्त्रांमुळे भारत जगात श्रेष्ठ आहे. तरीही स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे प्रा. रागी यांनी लक्ष वेधले.
महर्षी अरविंद, रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भारताविषयीचे योगदान स्पष्ट करून त्यांनी १९४७ ते २०१४ पर्यंतच्या भारतीय कालखंडाची परखड शब्दात मिमांसा केली तर, हिंदुंना गहन चिंतनाची गरज असल्याचे सांगून २०१४ नंतरच खऱ्या अर्थाने नव्या विचारांचा भारत घडत असल्याचे नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"