ठाणे : कोरोनामुळे गेल्या साधारण दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तासिका तत्त्वावर नेमलेल्या शिक्षकांना शाळा, महाविद्यालयांत सध्या नोकरी मिळेनाशी झाली आहे. परिणामी त्यांना जी मिळेल, जिथे मिळेल, ती नोकरी करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने सहायक प्राध्यापक भरतीला तत्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी नेट, सेट परीक्षा दिलेल्या पात्रताधारक युवकांकडून होत आहे.
तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची मजु्री ही एखाद्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारापेक्षाही कमी आहे. मात्र, तरीही अनेक प्राध्यापक, शिक्षक हे शाळा, महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करण्यास तयार असतात. तासिकांचे मानधनाचे दर वाढवून देण्याची शासनाने तयारी दाखविली होती; पण ती प्रत्यक्षात अमलात आणली नसल्याचे तरुण प्राध्यापकांचे म्हणणे आहे. त्यातच गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद असल्याने सहायक प्राध्यापकांना नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे आपलं घर, संसार चालविण्यासाठी, पोट भरण्यासाठी मिळेल ती नोकरी त्यांना पत्करावी लागत आहे.
----------
सेट-नेट परीक्षा देऊनही नोकरीअभावी बेरोजगार असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. राज्यात सहायक प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत, तेथे शासनाने भरती करावी म्हणजे आमच्यासारख्या नवोदितांना योग्य ती संधी मिळू शकते, असे मत सेट-नेट देऊनही बेरोजगार असलेल्या काही तरुणांनी व्यक्त केले.
-------
कोरोना येण्याआधी तासिका तत्त्वावर काम करीत होतो. परंतु, कोरोना आला आणि महाविद्यालये बंद झाली. परिणामी होती ती नोकरीही सुटली. त्यामुळे आता कधी नोकरी मिळेल त्या प्रतीक्षेत आहोत.
पी. रमाकांत, तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षक
----------
शासनाने सहायक प्राध्यापकांची भरती लवकरात लवकर सुरू करावी, आम्ही शिक्षण घेऊन त्याचा कोणताही फायदा होत नसल्याची खंत एका शिक्षिकेने व्यक्त केली.