कल्याण - पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, तसेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखणे, घरी त्यांचा अभ्यास कोण घेते, आदी माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यावर कल्याणमधील ‘रेल चाइल्ड संस्थे’च्या सरस्वती मंदिराचा अधिक भर असतो. शाळा-पालकांमधील नेहमीच साधला जाणारा संवाद आणि विविध उपक्रमांमुळे या मराठी शाळेची पटसंख्या वाढत आहे.प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव कोळी यांनी सांगितले, आम्ही मागील वर्षी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, हे पाहिले. पालकांनी त्यासाठी उपायही सुचवले. त्यामुळे यंदा शाळेचा दहावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी या उपक्रमाचा चांगला फायदा झाला. यंदाच्या वर्षी हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर इयत्ता तिसरीसाठी राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत दररोज एक ते दोन पालक शाळेत येतात. पालकांचा केवळ १५ मिनिटे वेळ आम्ही घेतो. पुढील वर्षी पहिलीसाठी हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. शाळेने मागच्या वर्षी परिसरातील सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांची नोंदणी केली. या मुलांना शाळेत सामावून घेतल्याने पटसंख्येत वाढ झाली आहे.इंग्रजी माध्यमापेक्षा आपली शाळा कुठे ही कमी नाही, हे पालकांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. पाठ्यपुस्तके आणि जनरल नॉलेज, यावर आधारित क्षमता परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. गणित, भाषा, बुद्धिमत्ता या विषयांवर ही परीक्षा असते. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण होते. विद्यार्थ्यांची प्रगती हेच शाळेचे ध्येय आहे.आपली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी जगवण्यासाठी आपणच प्रयत्न करण्याची गरज आहे. आपणच मराठीला जगवले नाही, तर मुले मराठी विसरून जातील. इंग्रजी माध्यमात मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत. म्हणून मराठी माध्यमावर माझा अधिक विश्वास आहे.- रवी साबळे, पालक
विद्यार्थ्यांची प्रगती हेच ‘सरस्वती’चे ध्येय, पालकांशी संवाद ठरतोय मोलाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:43 AM