ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातही पुन्हा पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. सर्व प्रकारची आंदोलने तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे आणि कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला याद्वारे मनाई आहे. हा आदेश १५ मेपासून २९ मेपर्यंत लागू राहणार आहे.
या आधी हे आदेश १ मे ते १४ मेपर्यंत लागू केले होते. पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, निदर्शने यासह विविध प्रकारच्या आंदोलनांना बंदी घातली आहे.
कोरोनासारख्या साथीच्या आजाराला अटकाव घालण्यासाठी तसेच आयुक्तालयाच्या क्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे कोणीही तलवारी, भाले, बंदुका यासारखे कोणतेही शस्त्र बाळगू किंवा विक्री करू नये. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, गायन आणि वाद्य वाजविणे किंवा एखाद्याच्या प्रतिमेचे दहन अशा सर्वच बाबींना यातून मनाई आहे. राज्यातील शांतता धोक्यात आणणे, प्रक्षोभक भाषण करणे, विचित्र हावभाव करणे, मिरवणुका आणि घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींचाही यात समावेश आहे.
* केवळ शासकीय कर्मचारी, विवाह कार्यासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी जमलेले लोक आणि त्यासाठी काढलेली मिरवणूक त्याचबरोबर न्यायालयीन कामकाज, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांना यातून वगळले आहे. हा आदेश १५ ते २९ मे २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. मेकला यांनी आदेशामध्ये म्हटले आहे.