आसनगाव : धरणांच्या तालुक्यातच सध्या भीषण पाणीटंचाई आहे. यामुळे होत असलेले आदिवासी महिलांचे हाल थांबावेत, यासाठी टाटा ट्रस्टच्या साहाय्याने एबीएम संस्थेने पुढाकार घेत करोडो रु पये खर्चून नळपाणीपुरवठा योजना राबवली आहे. या योजनेचे उद्घाटन सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले. शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील टेंभा ग्रामपंचायत हद्दीतील वरचा टेंभा आणि खैरपाडा या गावपाड्यांतील महिलांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या गावपाड्यांलगत मुंबई महापालिकेचे मोडकसागर धरण आहे. मात्र, तरीही पाणी मिळत नसल्याने येथील महिला कार्यकर्त्या संगीता कोर, प्रदीप वाढविंदे यांच्यासह ग्रामस्थांनी अनेकदा पाण्यासाठी आंदोलने करत प्रशासनापुढे हात पसरले. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने नेहमीच या आंदोलकांच्या लढ्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. त्यानंतर, एबीएम समाजप्रबोधन संस्थेचे सीताराम गायकवाड यांनी कोर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेशी भेट घडवली. टाटा ट्रस्टचे संचालक विश्वनाथ सिन्हा यांनी सकारात्मक भूमिका दाखवत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत या गावपाड्यांकरिता तब्बल ८० लाखांची नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेकरिता मोडकसागर धरणातून मुख्य पाइपलाइनद्वारे पाणी उचलण्यात आले असून खैरपाडा येथे ५० हजार लीटर क्षमतेच्या साठवण टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेतील ५० हजार लीटर पाण्याकरिता येथील आदिवासींना केवळ १५० रु पयांचा खर्च मोजावा लागणार आहे. यामुळे टंचाईने त्रस्त पाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता हे संगीता कोर, प्रदीप वाढविंदे यांच्या लढ्याचे यश असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, रामनाथ मोते, राजन धुलिया, अशोक इरनक, विजय तारे, संजना ठाकरे, विजय जाधव आदी उपस्थित होते. खा. कपिल पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, आ. पांडुरंग बरोरा, माजी आमदार दौलत दरोडा, समाजकल्याण न्यासचे सोन्या पाटील अनुपस्थित होते. (वार्ताहर)
टेंभा ग्रामस्थांसाठी पाणीयोजना
By admin | Published: April 29, 2017 1:34 AM