पुरोहितांनाही महागाईचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:57 AM2018-09-12T02:57:40+5:302018-09-12T02:57:58+5:30
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत. महागाईमुळे यजमानांकडून बुकिंग झाले नसल्याने पुरोहितांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत रोडावली आहे.
पुरोहित ल. कृ. पारेकर गुरुजी म्हणाले, श्रावण ते गणपती आणि नवरात्रात मराठवाडा, सोलापूर, खान्देश आणि कोकणातून डोंबिवली व ठाण्यातील उपनगरात पुरोहित येतात. यंदा डोंबिवलीत अडीच हजार पुरोहित आले आहेत. गणेश पूजनासाठी त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम असतो. परप्रांतातून येणाऱ्या पुरोहितांचे यजमान ठरलेले असतात. ते त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. डोंबिवलीतील यजुर्वेदीय आणि ऋग्वेदीय पुरोहित मंडळांचा पुरोहितांना बुकिंगसाठी उपयोग होत नाही. त्यामुळे पुरोहितांना गणेश पूजनाची कामे एकमेकांच्या ओळखीने मिळतात. डोंबिवलीत अथर्वशीर्ष मंत्रपठण करणारे मंडळ आहे. तेही मंत्रपठणासाठी पुरोहित देतात.
डोंबिवली शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांचे मिळून जवळपास सव्वालाख गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. डोंबिवलीत आठ हजार पुरोहित आहेत. परगावाहून आलेले पुरोहित मुंबई, विरार, नवी मुंबई, बदलापूर या विभागात जाऊन गणेशपूजन करतात. पुरोहितांकडून शहराची विभागणी क रून घेतली जाते. एखादा पुरोहित ठाण्यात गेल्यास त्या परिसरातील पूजाही त्यांच्याकडे दिल्या जातात. डोंबिवली शहराचीही चार भागांत विभागणी होते. डोंबिवली पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली आणि आयरे गाव अशा चार ठिकाणी एक-एक पुरोहित जातात, असे पारेकर म्हणाले.
>दक्षिणेत वाढ
महागाई वाढल्याने दक्षिणाही वाढली आहे. मागील वर्षी एका पूजनासाठी पुरोहिताला दीड हजार रुपये दक्षिणा मिळायची. यंदा ती २१०० ते २५०० रुपये झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत बुकिंग १० टक्क्यांनी कमी झाले आहे. यजमानांकडून बुकिंग नसल्याने पुरोहितांची संख्या रोडावली आहे, याकडे पारेकर यांनी लक्ष वेधले.