ठाणे : आर्थिक दुर्बल घटकांच्या घरात अंधार असताना , आपल्या अंगणातील दिव्यांचा प्रकाश संवेदनशील मनांना टोचत राहातो. त्यांचे दारिद्र्य पाहून मन व्यथित होत आहे. म्हणूनच त्यांच्याही घरात दिवाळीची स्नेहज्योत उजळावी , यासाठी उक्ती फाउंडेशन मदत करणार आहे. दारिद्र्याअभावी ज्या घरात दिवाळीची पणती पेटणार नाही, तेथे उक्तीच्या माध्यमातून मदतीचा हात पोहचविला जाणार आहे.
दिवाळी आली आहे. ठाणे, मुंबईसारखी शहरे दिव्यांच्या झगमगाटांनी न्हाऊन निघाली आहेत. बाजारपेठा ग्राहकांच्या खरेदीने ओसांडून वाहत आहेत. शहरातील ज्येष्ठ, युवक आणि बच्चे कंपनी नव्या कपड्यात रुबाबदार दिसत आहेत. महिला-मुलींच्या अंगावरही महागडे कपडे पाहायला मिळत आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने नागरिकांच्या कानठळ्या बसणार आहेत तर घराघरात विविध फराळांचा घमघमाटही सुटणार आहे. पण हे सुख सगळ्यांच्याच अंगणात दिसणार आहे का? या आनंदापासून वंचित असलेल्या घटकांचे काय? असे प्रश्न मनाला अस्वस्थ करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील दुर्बल आदिवासी पाडे, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक, झोपडपट्टीत राहणारे आर्थिक दुर्बल घटक या सगळ्यांची दिवाळी उक्ती फाउंडेशन गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना फराळ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत करणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून दान स्वरूपाने स्वीकारलेल्या वस्तू या दुर्बलांपर्यंत पोहचविणार आहे. संस्थेमार्फत उच्चभ्रू वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी विविध माध्यमातून संपर्क साधून त्यांना अशा वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जमा झालेल्या वस्तू गरजूंना दिल्या जाणार आहेत. फराळात तयार करण्यात आलेली एक करंजी, एक चकलीही लाखमोलाची मानून ती या घटकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. यासाठी ठाण्यात राहणाऱ्या तमाम इच्छुक नागरिकांनी त्यांच्या घरात दिवाळीसाठी तयार करण्यात आलेला फराळ, कपडे, अतिरिक्त भांडे आणि इतर सर्व प्रकारच्या वस्तू आमच्या संस्थेशी संपर्क करून दान कराव्यात असे आवाहन करीत आहोत. संस्थेच्या शेल्टरमध्ये या वस्तू आणून दिल्या जाऊ शकतात. अथवा संस्थेशी संपर्क साधून त्या आमच्या स्वयंसेवकांकडे द्याव्यात, असे आवाहन संस्थेच्या संचालिका गीतांजली लेले यांनी केले आहे. उक्ती संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असून आदिवासी, बेघर आणि गरिबांची दिवाळीही सुखकर करण्याचा छोटासा प्रयत्न केला जात आहे. ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१८ या सप्ताहात 'एक करंजी लाख मोलाची' हा उपक्रम राबविला जाणार असून या सप्ताहात संस्थेकडे जमा झालेल्या सर्व वस्तू ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडा, बेघर नागरिक आदींपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. असेही गीतांजली लेले यांनी सांगितले. उक्ती फाउंडेशन ही संस्था २००९ पासून सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक आदी विषयावर काम करीत आहे. विशेषतः विशेष मुलांसाठी कार्य करीत आहे. बेघरांसाठी ठाणे महानगर पालिकेच्या मदतीने शेलटर होम चालवीत आहोत. जे नागरिक रस्त्यावर झोपतात ते या शेलटरमध्ये राहू शकतात असेही त्या म्हणाल्या.