ठाणे : गेल्या अनेक वर्षापासून ठाणे-पालघर समायोजनामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अखेर पारदर्शीपणे मार्गी लावण्यास ठाणे जिल्हा परिषदेला यश आले असून विविध प्रकारच्या तब्बल २३५ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पदोन्नती देवून नवीन वर्षाची भेट देण्यात आली. ३१ डिसेंबरला पदोन्नती समितीने हिरवा सिग्नल दिल्यानंतर १ जानेवारी २०१९ रोजी पदोन्नती निकषानुसार या पदोन्नत्या देण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) चंद्रकांत पवार यांनी दिली.
२०१४ साली पालघर जिल्हा स्वतंत्र झाल्या नंतर समायोजन प्रक्रिया राबवण्यात येत होती. कोकण विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समायोजित प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण केल्यानंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या सुचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र पदोन्नती प्रक्रियेचे कामकाज करत होते.
यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ०५, कनिष्ठ प्रशासन अधिकारी १०, वरिष्ठ सहाय्यक १८ , कनिष्ठ सहाय्यक २०, वाहन चालक ०३, हवालदार १४ असे एकूण या विभागाच्या ७१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच लेखा विभागाच्या सहाय्यक लेखाधिकारी ०३, कनिष्ठ लेखाधिकारी ०३, वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी ०४, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी १० असे एकूण वीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली . त्याच बरोबर आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखिल पदोन्नती मिळाली असून यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला 06, आरोग्य पर्यवेक्षक ०३, पशुधन पर्यवेक्षक ०१, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०४ असा पद्धतीने पदोन्नत्या देण्यात आल्या.
१३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या ज्या कर्मचाऱ्यांची सेवा बारा आणि चौवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा तब्बल १३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.