ठाणे : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी सर्व परिचारिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोरोनाकाळात सेवाभावी वृत्तीने करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. परिचारिकांना काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आरोग्य संस्थांमधील परिचारिकांचा कामामध्ये सिंहाचा वाटा असून, परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. सद्यस्थितीत जागतिक कोरोना महामारीदरम्यान सर्व परिचारिकांनी केलेले खडतर परिश्रम तसेच समर्पणामुळे या महामारीशी सामना करता येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदअंतर्गत ५ तालुके व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत सद्यस्थितीत एकूण २०३ आरोग्यसेविका, २९ आरोग्य सहाय्यक महिला कार्यरत असून, त्यांच्या व्दारे कार्यक्षेत्रात माता बाल आरोग्य कार्यक्रम संबंधित सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांव्दारे गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्य सेवा, बालकांना लसीकरण आदी सेवा तसेच एनसीडी कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविण्यात येते.
ठाण्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी आरोग्यसेविका आणि आरोग्य सहाय्यक ( महिला) यांचे योगदान अतुलनीय आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि काेरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेकरिता त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीमुळे ग्रामीण कार्यक्षेत्रात लसीकरणाला वेग आल्याचे त्यांनी नमूद केले.