लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जर नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेने प्रस्ताव पाठवला तर या भागातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तयारी सरकार करील, अशी घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.
या घोषणेमुळे अन्य महापालिकांनी असेच प्रस्ताव पाठविले तर त्याविषयी सरकार काय करणार, अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबईतील १६ लाख नागरिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोनच दिवसांनी नगरविकासमंत्री शिंदे यांनी नवी मुंबईत ही घोषणा केली आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र, आता तेथे प्रशासक आहे. न्यायालयाने एप्रिल २०२२ पर्यंत निवडणूक घ्या, असे आदेश दिले होते. त्यावेळी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. या पालिकेवर शिवसेनेला स्वत:चा झेंडा फडकवायचा आहे. ते डोळ्यासमोर ठेवून शिंदे यांनी आजची घोषणा केली आहे.
नवी मुंबई महापालिकेने १९ जुलै २०१९ रोजी यासंदर्भातला ठराव मंजूर करून सरकारला पाठविलेला आहे. मात्र, त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. आता राजकीय गणिते बदलली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रशासकांना ठराव पाठवायला सांगितले आहे. नवी मुंबईत ३ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी १ लाख ९७ हजार मालमत्ता ५०० चौरस फुटांच्या आतील आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एकगठ्ठा मतांची बेगमी होईल अशी खेळी शिवसेनेने खेळली आहे.