ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी दिवसभरात ४५५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असली, तरी सर्वाधिक ५,८३४ चाचण्यांमधून ते सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे हे प्रमाण झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत केवळ सात टक्के आहे. त्यामुळे जशा टेस्ट वाढतील, तसे पॉझिटिव्ह रुग्णही वाढण्याची शक्यता असून त्यांना वेळेत क्व ारंटाइन करणे शक्य होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरात आतापर्यंत दोन लाख सात हजार टेस्ट झाल्या असून यामध्ये ९० हजारांच्या वर अॅण्टीजेन तर एक लाख २० हजारांवर आरटीपीसीआर टेस्ट झाल्या आहेत. तर, ठाण्यात आणखी एक लाख अॅण्टीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्याने चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील सर्वच महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत असतानाही झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र सर्वाधिक कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यात आजघडीला दररोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करण्यात येत असून पॉझिटिव्ह आढळणाºया रुग्णांची टक्केवारी मात्र ६.२ टक्के इतकी होती. मात्र, मंगळवारी दिवसभरात चाचण्यांचे प्रमाण जवळपास सहा हजारांच्या जवळ पोहोचले.
दरम्यान, अनलॉक आणि गणेशोत्सवानंतर प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले. आपल्या गावी गेलेले मजूर आता पुन्हा मुंबई आणि ठाण्यात दाखल होत असल्याने रेल्वेस्थानकातदेखील ठाणे महापालिकेने अॅण्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे स्थानकाच्या बाहेरच रुग्णांची टेस्ट केल्यानंतर यामध्ये एखादा मजूर पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला त्याच ठिकाणाहून थेट हॉस्पिटलला किंवा क्वारंटाइन सेंटरला दाखल करण्यात येत आहे. याशिवाय, मार्केट्स आणि ठिकठिकाणी अॅण्टीजेन टेस्टचे कॅम्पदेखील लावण्यात आले असून यामुळे शहरात टेस्टचे प्रमाण हे राज्यात आणि जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. टेस्टिंगचे हे प्रमाण वाढवण्यासाठी शहरात आणखी एक लाख अॅण्टीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाले आहेत.