ठाणे : गेल्या १५ दिवसांपासून ठाणेकर वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आणि आठ हे मुख्य महामार्ग जातात. या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ठाण्यातील फॉरेस्ट हिल रोडचा प्रस्ताव १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास ठाण्यातील टोलनाक्यांवर वाहतूक रोखून धरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ठाणे शहरातील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी फॉरेस्ट हिल रोडचा आणि कोस्टल रोडचा पर्याय निर्माण केला होता. फॉरेस्ट हिल रोडचा प्रस्ताव २००९ पासून प्रलंबित आहे. मोघरपाडा येथे चार वर्षांपूर्वी एम.एस.आर.डी.सी.ने पूल बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला होता. त्याची रक्कम आणि ना हरकत दाखला देऊनही काम पुढे सरकलेले नाही. कोपरीचा पूल तयार होऊनही वाहतूक सुरू झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे ठाणेकरांच्या मनात संतप्त भावना आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे. ते पूर्ण होईपर्यंत या मार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगाव टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.