लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बुलेट ट्रेनला असलेला राजकीय पक्षांचा विरोध मावळल्याचेच दिसत आहे. यापूर्वी ठाण्यातून जाणारा शीळ येथील मार्गाला विरोध झाला होता. परंतु, आता ठाणे महापालिकेने आपल्या नावे असलेले येथील भूखंडांपैकी ०.३८.४९ हे आर एवढे क्षेत्र नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लि.कडे हस्तांतरित करण्याचे निश्चित केले आहे. या बदल्यात महापालिकेला सहा कोटी ९२ लाख ८२ हजार मिळणार आहेत. आता तो पुन्हा मंजुरीसाठी २० नोव्हेंबरच्या महासभेत पटलावर ठेवला आहे. सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून या प्रस्तावाला विरोध केला जात आहे. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले असून त्याला मंजुरी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.
बुलेट ट्रेन ही ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे, त्यानुसार मौजे शीळ येथील ठाणे महापालिकेच्या नावे असलेला स.क्र. ६७/ब/५, भूखंडांंपैकी ३८४९.०० चौ.मी. क्षेत्राकरिता जिल्हाधिकारी ठाणे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणारी खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी महापालिका क्षेत्रातील गावांपैकी शीळ येथील जमीनमोबदला दर नऊ कोटी प्रतिहेक्टर निश्चित केलेल्या दरानुसार भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अबाधित ठेवून या भूखंडाचे अंतिम मूल्य सहा कोटी ९२ लाख ८२ हजार असे अंतिम केले.
हा भूखंड विकास आराखड्यातील रस्त्याचा भाग असून या भागातून हायस्पीड रेल जात असल्याने एनएचएसआरसीएल यांनी भूखंडाच्या मालकीच्या हक्काची मागणी केली असून त्यापोटी आता पालिकेला ही रक्कम मिळणार आहे. या भागातून ४०.०० मीटर विकास आराखड्यातील रस्ता असून त्यावर कल्याण रोड ते एमआयडीसी रोड उड्डाणपुलाच्या बांधकामास एनएचएसआरसीएल यांनी यापूर्वीच एमएमआरडीएला मान्यता दिली आहे.