- सदानंद नाईक
उल्हासनगर : नगरसेवक व प्रभाग समिती निधीतील विकास कामाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडून विहित नमुन्यात व अटी शर्तीत पाठविण्याच्या सूचना उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिल्याने, नगरसेवांकांच्या विकास कामावर गंडांतर आले. १२ कोटीच्या निधीतून बहुतांश गटार, नाले व पायवाटाच्या कामाचा समावेश आहे.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग नेहमी वादात राहिला आहे. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रभागातील विकास कामाबाबत नगरसेवक सक्रिय झाले आहे. एका नगरसेवकाला वर्षाला नगरसेवक निधी ८ तर प्रभाग समिती निधी ८ असा एकून १६ लाखाचा निधी दिला जातो. १६ लाखाच्या निधीतून विविध विकास कामाचे प्रस्ताव नगरसेवकांनी बांधकाम विभागाकडे पाठविले.
प्रभाग समिती व नगरसेवक निधीतील नगरसेवकांचे विकास कामाचे प्रस्ताव बांधकाम विभागाने मंजुरीसाठी उपायुक्त कार्यालयात पाठविले. मात्र बहुतांश प्रस्ताव विहित नमुन्यात व अटी शर्तीत बसत नाही. अश्या सूचना उपयुक्तांनी देऊन प्रस्ताव पुन्हा पाठविण्याचे बांधकाम विभागाच्या सुचविले. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सुचविलेल्या विहित नमुन्यात व अटी शर्तीत विकास कामे बसत नसल्याने, बांधकाम विभागाने फेरप्रस्ताव उपयुक्तांकडे पाठविले न नसल्याची चर्चा रंगली आहे.
नगरसेवकांच्या १२ कोटीच्या निधीतून दरवर्षी तीच ती गटारी बांधणे, गटारांची दुरुस्ती करणे, पायवाट बांधणे ही बहुतांश कामे आहेत. यापूर्वी ही कामे झाले का? झाले असेलतर किती वर्षे झाले? असे प्रश्न उपायुक्त कार्यालयातून विचारण्यात आले. तसेच प्रस्तावित विकास कामाच्या जागेचा फोटो पाठवून प्रस्ताव पुन्हा पाठविण्याचे उपयुक्तांनी बांधकाम विभागाला सुचविले. तेव्हां पासून बांधकाम विभागाकडून उपायुक्त कार्यालयात प्रस्ताव आले नाही. असे बोलले जात आहे. तसेच नगरसेवका मध्येही नाराजी निर्माण झाली. उपयुक्तांनी अटी-शर्ती घालून नगरसेवक निधीतील कामांना खोडा घातल्याची टीका होत आहे. तर अटी व शर्तीत कामाचे प्रस्ताव येणे, हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. तशा अटी शर्तीत प्रस्ताव आल्यास, नियमानुसार प्रस्तावाला मंजुरी द्यावीच लागते. असे उपायुक्त अशोक नाईकवाडे म्हणाले.
बांधकाम विभागाकडून कामाच्या निविदा नाही-
महापालिका बांधकाम विभागाकडून दरवर्षी ५० कोटी पेक्षा जास्त विकास कामाला मंजुरी दिली जाते. त्यापैकी किती कामाच्या निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाते? असा प्रश्न विचारला जात आहे. तर कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांनी सर्व कामे विहित नमुन्यात व अटी शर्तीत होत असल्याची प्रतिक्रिया दिली.