ठाणे : मागील सात वर्षांपासून कागदावर असलेल्या मत्स्यालयाच्या प्रकल्प उभारणीच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. मागील वर्षी अर्थसंकल्पात मत्स्यालयाला स्थान देण्यात आले नव्हते. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात त्याला स्थान दिले असले, तरी त्याची जागा मात्र बदलण्यात आली असून तिचा आकारही कमी झाला आहे.मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय असावे, अशी संकल्पना २००३ सालीच मांडण्यात आली होती. त्यानंतर, २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी या प्रकल्पाची औपचारिक घोषणा केली. जिल्ह्यातील नागरिकांना मत्स्यालय पाहण्यासाठी मुंबईला जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी ठाण्यात मत्स्यालय उभारण्याची कल्पना पुढे आली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर मत्स्यालयासाठी आर.ए. राजीव यांनी पुढाकार घेतला होता. त्याकरिता निविदादेखील मागवल्या होत्या. चीनमधील चायना ओशन कंपनी आणि मुंबईतील प्रीव्हिजन मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपन्यांनी याला प्रतिसाद दिला होता. आॅस्ट्रेलिया, दुबई यासारख्या देशांत मत्स्यालय उभारलेल्या चायना ओशन कंपनी आणि प्रीव्हिजन मॅनेजमेंट कंपनीने ठाण्यात मत्स्यालय उभारण्यासाठी तयारी दर्शवली होती. या कंपन्यांनी महापालिकेला प्रकल्प अहवालदेखील सादर केला होता. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ असलेल्या १३ हजार स्कवेअर फुटांवर ते उभारण्यात येणार होते. उर्वरित जागेवर हॉटेल, मॉल अथवा इतर काही सुरू करण्यासाठी परवानगीही देण्यात आली होती. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संबंधित एजन्सी मत्स्यालयाचा मेंटेनन्सही करू शकणार होती. या संपूर्ण बांधकामाच्या बदल्यात एक एफएसआय देण्याची मागणी एजन्सीकडून झाल्याने पालिकेने हा प्रस्तावच गुंडाळून ठेवला. त्यानंतर, केवळ अपुऱ्या जागेचा मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पासंदर्भात कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नव्हत्या.दरम्यान, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन वर्षांपूर्वी याबाबत नव्याने घोषणा केली होती. आता ते बीओटीवर न बांधता कन्स्ट्रक्शन्स टीडीआरस्वरूपात उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. यासाठी कॅडबरी जंक्शन येथे सर्व्हिस रोडलगत प्राप्त होणाºया १६ हजार चौमी सुविधा भूखंडावर मत्स्यालय उभारण्याचे सुरुवातीला प्रस्तावित केले होते. परंतु, हा सुविधा भूखंड प्राप्त होऊ न शकल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात घेण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते. परंतु, मागील वर्षी मत्स्यालयाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात केला नव्हता. दरम्यान, २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पुन्हा मत्स्यालयाचा उल्लेख केला आहे. आता ते गोल्डन डाइजनाका येथील अग्निशमन केंद्रालगत असलेल्या ७९० चौमी क्षेत्रावर ते उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.>सल्लागारांवर लाखो रु पयांची उधळपट्टीमत्स्यालयाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही कार्यान्वित झाला नसला, तरी या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागारांवर ९३ लाखांचा खर्च केला आहे.त्यानंतर, पुढच्या तीन वर्षांमध्ये या प्रकल्पासाठी एक कोटी ११ लाखांची तरतूद केली असली, तरी प्रकल्पच पुढे सरकला नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करूनही हा निधी खर्च होऊ शकलेला नाही.
मत्स्यालयाचा प्रस्ताव पुन्हा ठाणे महापालिकेच्या पटलावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:46 PM