लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली तेव्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे केवळ दोन मोठी रुग्णालये आणि १३ आरोग्य केंद्रे होती. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि तंत्रज्ञांचीही कमतरता होती. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मानधन तत्त्वावर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय अशा पदांवर ३८९ जणांची भरती करण्यात आली.
या भरतीच्या जोरावर महापालिकेने तीन हजार क्षमतेचे कोविड केअर सेंटर आणि सहा जम्बो कोविड रुग्णालये सुरू केली. पहिली लाट ओसरल्यावर भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार होता. तोच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. दुसरी लाट भयावह असल्याने त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया राबविली. तिलाही प्रतिसाद मिळाला असून, १२९ जण हजर झाले. मात्र, सध्या दुसरी लाट ओसरल्याने ८० जणांना कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
-----------------------
महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात मात करण्यासाठी मानधन तत्त्वावर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांची भरती केली होते. दुसरी लाट ओसरल्याने आता ८० जणांना कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. कोविड संपुष्टात येताच त्यांची सेवा संपुष्टात येईल, असे भरती करताना त्यांना सांगितले होेते. मात्र तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे त्यांना कामावरून कमी केले तरी पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी कामावर घेतले जाईल.
- डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.
------------
पहिली लाटेच्या वेळी घेतलेले कंत्राटी कर्मचारी - ३८९
दुसऱ्या लाटेच्या वेळी घेतलेले कंत्राटी कर्मचारी - १२९
एकूण कंत्राटी कर्मचारी - ५१८
दुसऱ्या लाटेनंतर कमी करण्याचा प्रस्ताव - ८०
---------------------------------
गरज सरली असली तरी वैद्य जिवंतच
- महापालिका हद्दीतील कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर काही जणांना कमी केले जाणार होते. मात्र कमी केले गेले नाही. आता दुसरी लाट ओसरल्यावर कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला असला तरी प्रत्यक्षात कमी करण्याची प्रक्रिया अद्याप केलेली नाही.
- सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने टाटा आमंत्रा हे कोविड केअर सेंटर १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. तेथे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.
- टाटा आमंत्रामधील १५ डॉक्टर, २७ नर्स आणि ४१ वॉर्डबॉय यांना कल्याण पश्चिमेतील महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील सुतिकागृहात रुजू करून घेतले जाणार आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवेसाठी ठेवले जाणार आहे.
---------------------