सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महासभेत उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड या तिन्ही रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचे प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली असून शहर विकासावर अश्या नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली असून राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवक सक्रिय झाले. शहरातील नागरिक पाणी टंचाई, साफसफाईचा बोजवारा, रस्त्याची दुरावस्था आदी मूलभूत समस्यांनी ग्रस्त असतांना, काही नगरसेवकांनी उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदली करण्याचा अशासकीय प्रस्ताव महापालिका महासभेत आणला आहे. गुरवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी महापालिका महासभा असून सर्वांचे लक्ष अशासकीय प्रस्तावाकडे लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर टीकेची झोड उठली. भाजपचे नगरसेवक राजेश वानखडे व शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्सना जाधव यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशनचे नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करा. असा अशासकीय प्रस्ताव आणला आहे.
राष्ट्रवादीमय झालेले भाजपचे दुसरे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांनी पक्षाच्या लेटरपत्रावर लक्षवेधी सुचनेद्वारे महापालिका हद्दीतील शहाड रेल्वे स्टेशनला संत भगत कंवाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. प्रस्तावाला एकमताने मंजुरी देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे सुचविले. तर दुसरीकडे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारतीचे स्लॅब पडून अनेकांचे बळी दरवर्षी जात आहेत. तसेच शेकडो जण बेघर होत आहेत. पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, तुंबलेल्या नाल्या, ओव्हरप्लॉ झालेली भुयारी गटारे, डम्पिंग ग्राऊंड, साफसफाईचा बोजवारा, अवैध बांधकामे, अर्धवट विकास कामे आदींमुळे शहर भकास झाले. मात्र या मूलभूत समस्या सोडविण्या ऐवजी नगरसेवक रेल्वे स्टेशनच्या नामांतराचे प्रस्ताव महापालिका महासभेत आणून शहरवासीयांचे लक्ष विचलित करीत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.