ठाणे : वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचा प्रकल्प अद्याप मार्गी लागला नसताना ठाणे महापालिकेने ठाणे खाडीत आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचा दावा केला आहे. त्यानुसार, ३२ किमीच्या ठाणे खाडीत जलवाहतुकीसाठी जेट्टीचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. त्यादृष्टीने पालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून ठाणे खाडीचा सर्व्हे केला असून ही जलवाहतूक कशी असेल, याचा अभ्यास पूर्ण केला आहे.ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी यापूर्वी ठाण्यात वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची घोषणा केली होती. त्यानंतर, अद्यापही या प्रकल्पाला फारसा वेग आलेला नाही. असे असताना आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुन्हा अंतर्गत जलवाहतुकीचा नवा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्यादृष्टीने अभ्यास केला असून ही जलवाहतूक कुठे, कशी वळविण्यात येईल, तिचे जंक्शन कुठे असतील, याचाही अभ्यास पालिकेने सुरू केला आहे. यासाठी खाडीतील गाळ काढून त्यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. या जलवाहतुकीने ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई अशी सेवाही भविष्यात निर्माण करण्याचा पालिकेचा विचार आहे. रस्त्यावरील ट्रॅफिक शिफ्ट करण्याचा प्रयत्नया वाहतुकीमुळे शहरात रस्त्यांवरील ट्रॅफिक कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खाजगी वाहनचालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागात रस्त्यावर होणारी गर्दी कमी होऊन ठाणेकरांना जलवाहतुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असा दावा पालिकेने केला आहे. जलवाहतूक सुरू करताना मुंबई मेरीटाइम बोर्ड, फॉरेस्ट आदींसह केंद्रीय बोर्ड आदींसह इतर परवानग्या पालिकेला घ्याव्या लागणार आहेत. ती सुरू करताना भरती आणि ओहोटीचाही विचार केला जाणार असून त्या काळात कशा पद्धतीने ही वाहतूक सुरू ठेवता येऊ शकते, याचाही अभ्यास पालिकेने केला आहे. खाजगी संस्थेला हे काम देऊन त्यातून जे उत्पन्न मिळेल, त्यातील काही हिस्सा हा पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.
ठाणे खाडीतून वाहतुकीचा प्रस्ताव
By admin | Published: November 10, 2015 12:44 AM