ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक-५ आणि ६ वरील दोन्ही बाजूंकडील लोकलचे तीनतीन डबे पुढे थांबवण्याच्या प्रस्तावाला मध्य रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच फलाट क्रमांक-६ वरील लोकलचे डबे पुढे गेल्यावर त्या तीन डब्यांतील प्रवासी थेट मुंबईकडील नव्या पुलाने बाहेर पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.फलाट क्रमांक-५ आणि ६ या दोन्ही फलाटांवर एक्स्प्रेसबरोबर जलद मार्गावरील लोकल धावतात. त्यातच बऱ्याच वेळा या फलाटांवर एकाच वेळी लोकल येण्याचे प्रमाण जास्त आहे. एकाच वेळी लोकल आल्याने सरकता जिना आणि जुन्या पुलावर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत असल्याने एखाद्यावेळी तेथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही फलाटांची लांबी जास्त असल्याने दोन्ही लोकल तीन डबे पुढे जाऊन थांबू शकतात. ही बाब मध्यंतरी ठाणे रेल्वेस्थानकात पाहणी दौºयावर आलेले मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक डी.के. सिंग यांना ठाणे रेल्वे प्रशासनाने निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तयार करत, तो मंजुरीसाठी पाठवल्यावर रेल्वे प्रशासनाने त्याला तत्काळ मंजुरी दिली आहे. सुरुवातीला फलाट क्रमांक-६ वरील लोकलचे तीन डबे लवकरच पुढे नेले जाणार आहेत. त्यादृष्टीने कामही सुरू झाले आहे. तर, ६ वरील लोकलचे तीन डबे पुढे गेल्यानंतर काही दिवसांत ५ वरील लोकलचे तीन डबे पुढे नेण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात लोकलचे तीन डबे पुढे नेण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:08 AM