- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव नुकतेच सुरु झाले असुन त्याला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव साकारण्याचा मार्ग येत्या २६ फेब्रुवारीच्या महासभेत मोकळा होणार आहे. त्याच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता मिळणार असुन गेल्या ७ वर्षांपासुन रेंगाळलेले तिसरे तरणतलाव मात्र अद्याप लटकलेच आहे.
पालिकेने २०१४ मध्ये बांधलेल्या क्रिडा संकुलात सध्या एकमेव तरणतलाव साकारण्यात आले आहे. या तरणतलावामुळे नागरीकांची सोय झाली असली तरी पालिकेकडुन सुरु होणारे आणखी दोन तरणतलाव लालफितीत अडकले होते. त्यापैकी भार्इंदर पुर्वेकडीलच नवघर परिसरात असलेल्या आरक्षण क्र. १०९ वरील नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव साकारण्याचा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक दिनेश नलावडे यांनी पालिकेकडे सादर केला होता. त्याचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाने नुकतेच तयार केले असुन त्याला महासभेची मान्यता आवश्यक ठरणार आहे. प्रशासनाने त्यासाठी चालु अंदाजपत्रकात २ कोटींची तरतुद केली आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना त्यावर आयुक्तांची मान्यता महत्वाची ठरली होती. परंतु, त्यात विलंब लागल्याने उशीरा का होईना, हा तरणतलाव साकारण्याचा मार्ग येत्या २६ फेब्रुवारीच्या महासभेत मोकळा होणार आहे. त्याच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला २६ फेब्रुवारीच्या महासभेने मान्यता दिल्यास त्या भूखंडावर दुसरा तरणतलाव साकारला जाणार आहे. हा तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारण्यात येणार असल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. तत्पुर्वी दहिसर चेकनाका परिसरात भव्य गृहसंकुल बांधणाय््राा लोढा बिल्डरला पालिकेने २०११-१२ मध्ये बांधकाम परवानगी दिली. त्यापोटी पालिकेला सुमारे ७ हजार चौरस मीटर जागा नागरी सुविधा भुखंडाच्या माध्यमातुन प्राप्त झाली. त्या जागेवर बिल्डरच्याच प्रस्तावानुसार पालिकेने खाजगी शाळा बीओटी तत्वावर सुरु करण्याची परवानगी बिल्डरला दिली. त्यापोटी महिन्याला सुमारे १ लाख २० हजार रुपये भाडे पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. याविरोधात सेनेचे माजी नगरसेवक प्रशांत पालंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान बिल्डरने पालिकेला नियोजित तरणतलावासाठी नवीन जागा प्रस्तावित केली असुन ती अपुरी तसेच ती तरणतलावासाठी अयोग्य असल्याने पालिकेकडून ती नाकारण्यात आली आहे. यामुळे काशिमिरा, पेणकरपाडा, महाजनवाडी, मीरागाव आदी ठिकाणच्या जलतरणपटूंच्या तिसऱ्या तरणतलावाचे स्वप्न दुभंगले आहे.