ठाणे : ठामपातील महिला अधिकाऱ्यावर सोमवारी भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी येथील समिती सभागृहात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली महिला अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तीत या घटनेतील समाजकंटकावरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कठोर शिक्षा द्यावी, क्षेत्रीय कर्तव्य बजावताना सुरक्षा द्यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या.
या निवेदनाची प्रत त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह पोलीस आयुक्तांना देऊन विविध मागण्या केल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, अपर जिल्हाधिकारी फरोज मुकादम, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर आदी महिला अधिकारी उपस्थित होत्या.
मंत्रालय असो या कोणतेही क्षेत्रीय कार्यालय असो तेथील अधिकाऱ्यास व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रकारच्या हिंसेला सामोरे जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कायद्याबद्दल कोणतेच भय न वाटणाऱ्या अशा समाजविघातक प्रवृत्तीचे आक्राळविक्राळ स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक भयावह होत चालले, असे निदर्शनात आणून या महिला अधिकाऱ्यांनी ''पिंगळे, यांच्यावरील या सनिर्घृण हल्ल्याचा केवळ निषेध करून आम्ही गप्प बसणार नाही'' असा इशारा दिला. महिला अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या मुख्य अधिकारी संघटना व कर्मचारी संघटनेमार्फत विविध मागण्या केल्या आहेत.
यात समाजकंटकांवर केवळ कठोर कारवाईचे आश्वासन देऊन भागणार नाही, तर शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या गुन्ह्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून गुन्हेगारांना तत्काळ कठोर शासन करा, क्षेत्रीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना शस्त्रधारी अंगरक्षक द्यावा. पुरेपूर कार्यक्षम बंदोबस्त उपलब्ध व्हावा, दाखल गुन्ह्याची योग्य व वेळेवर दखल घेतली जावी. विनाविलंब वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यांचा समावेश आहे.
कॅप्शन - महिला अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन स्वीकारताना ठाणे अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे. सोबत अन्य अधिकारी महिलावर्ग.