कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे, सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे तसेच रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांविरोधात २० एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार होती. परंतु, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रशासनाने ही मोहीम पुढे ढकलली आहे. आता ५ मेनंतर ही मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.महापालिका हद्दीतील प्रमुख ८५ रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. प्रारंभी कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले. आता महापालिका २० एप्रिलपासून ‘अ’ प्रभागात रुंदीकरणाची मोहीम घेणार होती. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रहिवासी बाधित होणार आहेत. त्यामुळे या कारवाईस तीव्र विरोध होण्याची शक्यता पाहता कारवाईच्या वेळी राज्य राखीव दलाच्या १०० पोलिसांचा विशेष बंदोबस्त पुरवण्याची मागणीही महापालिकेने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती.मात्र, ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मोहिमेला प्रारंभ झाला नाही, असे बेकायदा बांधकामविरोधी विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
केडीएमसीची कारवाई लांबणीवर
By admin | Published: April 25, 2016 2:57 AM