ठाणे - कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत जय भारत मैदानाच्या शेजारी अवघ्या चार महिन्यांत आठ मजली अनधिकृत इमारत उभी राहिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही कळवा प्रभाग समितीकडून या इमारतीवर कारवाई न झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेऊन कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली.
या नोटिसीला तीन दिवसांत उत्तर देणे बंधनकारक आहे, अन्यथा शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा इशारा दिला आहे. बेकायदा इमारतीवर पालिकेने यापूर्वी कारवाईचा देखावा केला होता. त्यानंतरही ही इमारत पुन्हा उभी राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध होऊनही निर्ढावलेल्या स्थानिक विकासकांकडून अनधिकृत इमले चढविणे सुरूच होते. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. कळवा प्रभाग समितीत कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अनधिकृत बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचेही या नोटिसीत म्हटले आहे. तत्कालीन सहायक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव व सध्याचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांनी काय म्हटले आहे नोटिसीत?बेकायदा बांधकामावर वेळीच कारवाई न झाल्याने तथा दिखाऊ व जुजबी कारवाई होत असल्याने अप्रत्यक्षपणे आपण अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार ही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून, आपल्या विरोधात शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करू नये, असा सवाल उपस्थित करीत तीन दिवसांत याचा खुलासा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खुलासा केला नाही तर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल, असे नोटिसीत स्पष्ट केले आहे.