कल्याण : शहरात बुधवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विविध ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. या पावसामुळे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील पांडे बंगल्यासमोर एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने वाहनचालकांसह नागरिकांना वाहत्या पाण्यातून वाट काढावी लागली. चक्कीनाका परिसरानजीक असलेल्या दामोदर नगरातील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे त्यांना सकाळपासून दुपारपर्यंत घरातील पाणी उपसावे लागले. चिकणघर परिसरातील नागरिकांच्याही घरात पाणी शिरले. कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील तहसीलदार कार्यालय आणि कल्याण न्यायालयाच्या नजीक पाणी साचले होते. नाल्याच्या जुन्या इमारतीची तौक्ते वादळामुळे पडझड झाली होती. आज न्यायालयास साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला.
पूर्वेतील ऑस्टीन नगरातील घरांतही पाणी शिरल्याने तेथे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी धाव घेतली. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नालेसफाई केली नसल्याने पहिल्या पावसात नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
नालेसफाईचा दावा फोल
केडीएमसीने मोठ्या ९४ नाल्यांच्या सफाईच्या कामावर सव्वातीन कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर लहान नाल्यांची सफाई केल्याचा दावा केला होता. तरीही सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नालेसफाईचा दावा पहिल्या पावसात फोल ठरल्याचे उघड झाले.
--------------------