उल्हासनगर : धोबीघाट येथील खचलेल्या डोंगराला सरंक्षक भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. संततधार पावसाने डोंगरावरील दोन घरे पडून काही घरांना तडे गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात महापालिकेने काही घरांना नोटिसा दिल्या होत्या.
उल्हासनगरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पावसाने धुमाकूळ घातला. संततधार पावसाने धोबीघाट येथील डोंगर खचून डोंगराजवळील दोन घरे पडून काही घरांना तडे गेले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी १२ पेक्षा जास्त घरांना नोटिसा देऊन घरे रिकामी करण्याचे सांगितले. या प्रकाराने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण होते. धोकादायक इमारत व पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांना पर्यायी जागा देत असताना डोंगरावरील नागरिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी महापालिकेला करून डोंगरकडेला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली हाेती. अखेर, महापालिकेने संरक्षक भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती शेख यांनी दिली.
महापालिकेचे शहर अभियंता महेश शीतलानी यांनी आयुक्त, विभागाचे उपायुक्त यांच्या आदेशानुसार डोंगराच्या कडेला संरक्षक भिंत बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती दिली. तर, डोंगरकड्यावरील नागरिकांनी समाधान व्यक्त करून पर्यायी घरे देण्याची मागणी केली.