लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : सोलापूर बोरगाव येथील मातंग जातीच्या सरपंचाच्या भावाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा निषेध शहर मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने करून तहसीलदार यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले आणि कारवाईची मागणी केली. पुरोगामी राज्याला काळिमा फासण्याची शक्यता असल्याचे मत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सोलापूर बोरगाव गावाचे सरपंच यांचा भाऊ धनाजी साठे यांचे निधन झाले; मात्र गावच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. अखेर समाजाने व सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले. या प्रकाराचा राज्यातून निषेध व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून उल्हासनगर येथे शहर मानवहित पक्षाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी पक्षाचे सचिन साठे यांनी केली. अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार संपूर्ण गावकऱ्यांवर व पोलीस प्रशासनावर कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी घोषणा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिल्या.