बदलापूरच्या शिरगाव परिसरात कोणार्क गार्डन नावाचा मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी फ्लॅटधारकांना पाण्याची सोय करून देण्यासाठी जीवन प्राधिकरणमार्फत जलवाहिनी टाकली आहे. ही जलवाहिनी या सोसायटीतील नागरिकांची तहान भागविण्यास अपुरे पडत असल्याने या भागातील नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाकडे सातत्याने पाठपुरावा केला, तसेच वाढीव पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, आहे त्या जलवाहिनीमधून येणाऱ्या पाण्यावरच तहान भागविण्याची सक्ती बांधकाम व्यावसायिक करीत असल्याने आता नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी बंद करून त्या ठिकाणी एमआयडीसीची जलवाहिनी टाकण्याची मागणी केली आहे. थेट एमआयडीसीकडून जलवाहिनी घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक चालढकल करीत असल्याने नागरिकांनी या पाणी समस्येविरोधात आपल्या सोसायटीतच निषेध व्यक्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. सोसायटीच्या आवारात रिकामे बकेटचे तोरण बांधून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, तर याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
रिकामे बकेटचे तोरण बांधून पाणीटंचाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:40 AM