उल्हासनगर : महापालिका कंत्राटी कामगाराच्या चौकशी समितीचा अहवाल देत नसल्याच्या निषेधार्थ कायद्याने वागा संघटनेच्या राज असरोंडकर यांच्यासह कंत्राटी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच अहवालाची प्रत मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचे संकेत असरोंडकर यांनी दिले असून महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मात्र ७ ते ८ दिवसात अहवालाची प्रत देणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वाहन विभाग, सुरक्षा विभाग, अग्निशमन दल विभाग आदी विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार विविध ठेकेदारा मार्फत घेतले आहे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या काही ठेकेदारांची नोंदणी कामगार आयुक्त यांच्याकडे नसतांना कामगार पुरविण्याचा महापालिकेने दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शासन नियमानुसार कंत्राटी कामगारांना वेतन मिळत नसल्याने, कंत्राटी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला. यामध्ये महापालिका अधिकारी व ठेकेदार संगनमत करून कंत्राटी कामगारांची पिळवणूक करीत असल्याचा आरोपही केला आहे.
महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायद्याने वागा संघटनेचे राज असंरोंडकर यांनी उचलून गेल्या महिन्यांपूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देऊन समितीच्या अहवालानंतर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अध्यापही चौकशी समितीचा अहवाल आला नसल्याने, असरोंडकर यांनी चौकशी समितीच्या अहवालाची मागणी करून महापालिके समोर कंत्राटी कामगारा सोबत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले. कोरोना काळात स्वतःसह घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या वॉर्डबॉय यांचा ठेका रद्द करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली. अशी टीकाही सर्वस्तरातून होत आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महापालिकेचे रुग्णालयाचे खाजगीकरण केले जात आहे.
ठेकेदार व अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार महापालिका कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार कमी वेतन दिल्याचा प्रकार उघड होऊन, पगारातील फरक द्यावा लागणार आहे. गेल्याच आठवड्यात कार्यरत एकून ८३ कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी गेल्या तीन वर्षात एकही सुट्टी घेतली नसल्याचा प्रकार उघड झाल्याने, महापालिकेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. तर इतर कंत्राटी कामगारांमुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार असल्याचे बोलले जात आहे.