सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, टेलिफोन एक्सचेंज जवळील राहुलनगर येथील नागरिकांनी पाण्यासाठी मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, टेलिफोन कार्यलय शेजारील राहुलनगर मध्ये काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. अखेर सोमवारी पाणी टंचाईला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. आमदार कुमार आयलानी यांच्या मध्यवर्ती कार्यालय हाकेच्या अंतरावर असून नागरिकांनी आयलानी यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे गोलमैदानकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्या नागरिकांनी राहुलनगर मधील पाणी, रस्ते व विजेच्या समस्याचा पाडा वाचला. महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणी धाव घेऊन पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दलित पॅन्थरच्या मिना बाविस्कर, छाया अहिरे, संगीता बागुल, गौरी बाविस्कर, संगीता मोरे यांच्या नेतृवाखाली शेकडो नागरिकांनी पाणी टंचाईसाठी रस्ता रोको आंदोलन केले. राहुलनगर हे आमदार कुमार आयलानी यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असूनही समस्याने ग्रस्त असल्याची खंत बाविस्कर यांनी व्यक्त केली.