ठाणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, नुकतेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली आज निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन राज्यपाल यांना राज्याबाहेर पाठवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात, त्यांच्याबद्दल संताप निर्माण झालेला असून, समस्त शिवप्रेमी मराठी जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या पुरोगामी राज्यात अशाप्रकारची विधाने करुन, राज्यातील व देशातील सामाजिक वातावरण जाणूनबुजून बिघडवण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही राजे यांच्याकडून करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून, राज्यपालांची अनेक विधाने सातत्याने वादग्रस्त ठरलेली आहेत, हे याआधीच समोर आल्याचा आरोप करीत राजे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा निषेध व्यक्त करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. या आंदोलनात 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, नरेंद्र पंडित, सचिव विनोद मोरे आदींचा समावेश होता.